"प्रयासाची गाथा..."

प्रयासाची गाथा लिहिली,
कित्येकदा अपयश प्यालो,
सोपं नाही संघर्ष करणं,
उगीच नाही बदनाम झालो...

रोजरोजच्या घालमेलीशी
मनातल्या मनात लढत आलो,
उद्या जिंकणार या आशेवर
स्वतःशीच नेहमी हारत आलो...

ललाटावर नाही उमटत
एकमेकांच्या संघर्षाची शाई,
ठरवून सुद्धा कोणी कोणाचं
आयुष्य जगूच शकत नाही...

करतो नवा प्रयास निरंतर
मिळावी एक योग्य दिशा,
माझ्या या सैरभैर मनाला
मिळावी एक स्थिर आशा...

भेटली अशी कित्येक लोकं
ज्यांनी चालली हीच वाट,
जिंकली मनं आणि क्षणं
परिस्थितीवर करुनी मात...

समजावतो रोज स्वतःला
उद्याचा दिवस असेल माझा,
गेला दिवस जर संघर्षाविना
तीच असेल माझी सजा...

कुठेतरी असेल स्मशान शांतता
या चंचल मनाच्या कोपऱ्यात,
त्याच ठिकाणी भस्म करतो
दर्प सदविचारांच्या गौऱ्यात...

गीतासारात आयुष्य उकललं
अर्जुनाला हीच स्थिती भोवली होती,
सर्वांना संकट सारखीच असतात
पण त्याच्यावर श्रीकृष्णाची सावली होती...

पण ध्येयाचा पिच्छा सोडून
कोणतंच होणार काम नाही,
आता फक्त धडपडणं लढणं
आता कधीच आराम नाही...

करतो एक सुरुवात नवी
रचतो आयुष्याची कथा,
पुन्हा एकदा लिहितो नव्याने
माझ्या "प्रयासाची गाथा..."

- डॉ संदीप सोमेश्वर टोंगळे.

Comments

Popular Posts