मनाचं स्मशान...

असायला हवे होते एक स्मशान
या अथांग मनाच्या कोपऱ्यात,
त्यात मनातल्या अपूर्ण इच्छा
करता आल्या असत्या भस्मसात...
मनाला सतावणाऱ्या चिंतांची
करता आली असती राख...
नको असलेल्या डोक्यातल्या कचऱ्याची
लावता आली असती विल्हेवाट...

असायला हवे होते एक स्मशान
या अथांग मनाच्या कोपऱ्यात,
या असह्य कल्लोळापासून दूर
राहिली असती निरव शांतता...
या रंग बदलणाऱ्या दुनियेपासून
मनाला ठेवलं असतं अलिप्त...
या विचारांच्या गदारोळापासून
मनाला मिळाला असता एकांत...

असायला हवे होते एक स्मशान
या अथांग मनाच्या कोपऱ्यात,
त्यामुळे टाळता आलं असतं
संपूर्ण मनाचं नष्ट होणं...
संपूर्ण मनाचं स्मशान होणं...

- डॉ संदीप सोमेश्वर टोंगळे.

Comments

Popular Posts