खरं काय?

जगण्यातलं धैर्य
की मरणातलं स्थैर्य
उगवती चंद्रकोर
की मावळता सूर्य

बैचेन अस्थिर मन
की शांत क्षण
धावणारी नदी
की स्थिरावलेलं तण

हारून जिंकणं
की जिंकून हारणं
मनातुन झुरणं
की वरवरची कारणं

कल्पना विलास
की घडलेल्या गोष्टी
आंधळ्याची दृष्टी
की डोळसाची सृष्टी

संस्कृती संस्कार
की विचारांची धार
सागराची खोली
की गगणाचा विस्तार

निसर्गाचा सुगंध
की मनातली दुर्गंध
हक्काची नाती
की जुळलेले बंध

गीतेचा अर्जुन
की सीतेचा राम
मानसिक कष्ट
की गाळलेला घाम

मोकळं आकाश
की इंद्रधनुष्य
मी हिंदू की मुस्लिम
की एक हतबल मनुष्य

खरं काय?

- डॉ संदीप सोमेश्वर टोंगळे.

Comments