"माणुसकीची भाषा"

या रंगबिरंगी दुनियेत आपण
आपलंच दुःख लपवून हसलोय
कधी आतल्या आत रडलोय
कधी स्वप्न रंगवून हिरमुसलोय
तर कधी ध्येय ठरवून फसलोय
पण या विश्वरूपी संसारात आपण
फक्त आपल्या पुरतच जगत
स्वतःलाच बिलगून बसलोय...

हसणं झालंय वरवरचं
रडणं सुद्धा नकली
असा असतो तोरा आपला
जशी आयुष्याची लढाई जिंकली...

सत्याला लावला जातोय
मुलामा मनमोहक असत्याचा
खऱ्याचं खोटं, खोट्याचं खरं
हा आता धंदाच झालाय नित्याचा...

कोणालाच कोणाची नाही चिंता
प्रत्येक जण बघतोय आपला स्वार्थ
माणसातली माणुसकी आलीय संपत
शोधावा लागेल जगण्याचा नवा अर्थ...

आपल्या सर्वांच्या सभोवती आहे
एक स्वातंत्र्याचा अदृश्य पडदा
भेदभावाच्या पिंजऱ्यात राहून
आपणच पाडलाय माणुसकीचा मुडदा...

कधीतरी उगवेल सत्याचाही सूर्य
आहे मनात एक आशा
स्वार्थाच्या पलीकडे जाऊन समजेल
आपल्याला "माणुसकीची भाषा".

- डॉ संदीप सोमेश्वर टोंगळे.

Comments

Popular Posts