जखम


ठेच लागून मनाला
मन जखमी व्हावं,
आपण आयुष्यभर
त्या व्रणाला जपावं,
कदाचित
जखमा जोपासणं
अगत्य असावं,
कारण
खपलीच्या मागेच
आपल्या जीवनाचं
खरं सत्य असावं......

या जुन्या खपल्यांनी
कधीतरी मनाला
असं छळावं,
या साऱ्या जखमांतुन
कधीतरी रक्त
असं भळभळावं,
जसं आयुष्यात एकदा
इतकं कडक ऊन पडावं,
अन् आपल्याला
आपल्याच नजीकच्या
सावलीचं महत्व कळावं......

लपवून मनातल्या
वेदना निरंतर
गालावर हसू असावं,
डोळ्यातले अश्रू
पापण्यांनी पिऊन
हिमतीने लढावं,
काळीज नेहमी
धगधगतं असावं,
त्यात दुःख सारं
जळून खाक व्हावं......

आयुष्य जगताना
ठेच लागणारचं,
जखमा होणारचं,
या खपल्यांना
अनुभवाच्या शिदोरीत
जपून ठेवता यावं,
आपला जीवनमार्ग
खडतर च असतो,
ठेच लागली तरी
निरंतर चालत राहावं,
आयुष्य नेहमी
असं जगावं,
की आपलं जगणं पाहून
इतरांना जगणं कळावं......

- डॉ संदीप सोमेश्वर टोंगळे.

Comments

Popular Posts