“चला मित्रांनो श्रमदान करूया”

पानी रे पानी तेरा रंग कैसा
जिसमें मिला दो लगे उस जैसा

          पण आता या बेरंग पाण्याने अनेकांच्या आयुष्यात रंग भरायला सुरुवात केलीय...... माणुसकीचा रंग, सामाजिक बांधिलकीचा रंग, मन संधारण आणि जल संधारणाचा रंग...... गावंच्या गावं पाणीदार करायचा विडा उचललेली “पानी फौंडेशन” आणि त्यांच्या साथीने पाण्यासाठी पेटून उठलेले गावकरी यांच्या कष्टाला आणि जिद्दीला खरच माझा सलाम. छोटसं रोपटं लावलं की भविष्यात त्याच मोठं झाड होतं तसच आज जमिनीवर पडलेल्या या घामाच्या थेंबातून भविष्यात गावं पाणीदार होणार आहेत हे मात्र नक्की. फक्त शहरांचा विकास हा देशाचा विकास असूच शकत नाही तर गावांच्या प्रगतीतून शहरांचा विकास हाच खरा विकास आहे हे “पानी फौंडेशन”नी त्यांच्या कामातून दाखवून दिलंय आणि त्यांना गावकऱ्यांनी अगदी मोलाची साथ दिलीय. काही काही गावात तर आख्ख गावच्या गाव श्रमदान करत आहे. बायका, पोरं-पोरी, लहान मुलापासून वृद्धापर्यंत अगदी सगळे घाम गाळत गावासाठी श्रमदान करत आहेत. या सर्वांना त्या घामाची किंमत नक्कीच कळली आहे म्हणून तर ना वयाचा ना शरीराचा विचार करता अगदी झोकून देऊन श्रमदान सुरु आहे. या उन्हाच्या दाहकतेत श्रमदान करत असताना त्यांच्या घामाचे थेंब जमिनीवर पडत आहेत आणि क्षणार्धात विरून ही जात आहेत पण घामाच्या थेंबाचा जमिनीशी आलेल्या संपर्कामुळे जो सुगंधित दरवळ तयार होतोय तो आख्ख्या महाराष्ट्रभर पोहोचू लागलाय. हाच सुगंधित दरवळ सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या प्रत्येकापर्यंत पोहोचला आणि प्रत्येकाने आपापल्या परीने श्रमदानाला सुरुवात केली आहे. बघता बघता लाखो घनमीटर जलसंधारण कामाची नोंद “पानी फौंडेशन”पर्यंत पोहोचली आहे. नेहमीच सामाजिक बांधिलकी जपण्यात अग्रेसर असणाऱ्या माढयाच्या रोटरी क्लबपर्यंत हा सुगंधित दरवळ पोहोचला आणि आता रोटरी क्लब ऑफ माढाचा प्रत्येक सदस्य पुढाकार घेऊन श्रमदान करण्यास उतरला आहे. नकारात्मक गोष्टींना बगल देत सकारात्मकतेची कास धरून रोटरी सदस्य सहकुटुंब श्रमदान करत आहेत.

          माझ्या शेतात पाणी भरपूर आहे, माझ्या शेतात २ बोर आहेत, दोन्ही बोर १२ तास चालतात, विहिरीला मुबलक पाणी आहे मग मी का श्रमदान करू? या श्रमदानाचा माझ्या शेताला काय उपयोग? मला अजिबात वेळ मिळत नाही? मला बाकी खूप काम असतात? मी डॉक्टर आहे, इंजिनिअर आहे, शिक्षक आहे, पुढारी आहे, नेता आहे, अधिकारी आहे, मोठा उद्योजक आहे मग मी हे काम कसं करायचं? असले नकारात्मक आणि अपंग विचार डोक्यात न घेता श्रमदानासाठी एकदा मातीला हात लावून तर बघा, तुमच्या मनात श्रमदानाची ठिणगी नक्की पेटेल. पुढच्या पिढीच्या पाठ्यपुस्तकात या श्रमदानाचा पाठ नक्की असेल. आज जर आपण श्रमदान नाही केलं तर आपली पुढची पिढी आपल्याला नक्की विचारेल आपल्या श्रमदानातल्या योगदानाबद्दल, तेव्हा मान खाली घालायची वेळ येऊ द्यायला नको. एका गावात एक वृद्ध आज्जी जी निराधार आहे, दुसऱ्या गावात एक गरीब कुटुंब ज्यांना एक गुंठा सुद्धा शेती नाही, आणि एका गावात एक दिव्यांग व्यक्ती जी अधिकारी आहे अशी प्रत्येक गावात अनेक उदाहरणे आहेत की जे स्वतःच्या वयाचा किंवा शरीराचा कसलाही विचार न करता अगदी पेटून उठत काम करत आहेत. या सर्वांनी त्यांच्या कामातून दाखवून दिलंय की कमकुवत आणि अपंग हे नसून शरीराने निष्क्रिय आणि मनाने अपंग आपणच सर्व आहोत. दोन हात दोन पाय असलेली धडधाकट माणस हाताची घडी घालून बसतात आणि पायात कसलाही त्राण नसणारा अपंग व्यक्ती अधिकारी असून सुद्धा मातीत बसून खड्डे करतो आहे, ती आज्जी शरीरात आहे तेवढी ताकत लावून मातीने भरलेली पाटी उचलत आहे आणि त्या गरीब कुटुंबातला प्रत्येक जण अगदी जीव ओतून दिवसभर श्रमदान करत आहे. ही इतकी जिद्द का? कशासाठी? कोणासाठी? तर या सर्वांना त्याचं गाव पाणीदार करायचं आहे. काय म्हणाव या जिद्दीला...... आणि तो अमीर खान, तो जितेंद्र जोशी आणि इतरही दिग्गज मंडळी “पानी फौंडेशन”च्या माध्यमातून जीवाच रान करत आहेत. का? तर त्यांना महाराष्ट्र पाणीदार करायचा आहे. गड्यांनो खरंच सलाम तुमच्या जगण्याला......

          हे सर्व लोक जर स्वतःपुरता विचार करून स्वतःचाच व्याप बघत बसले असते तर आज जी ठिणगी पडून श्रमदानाचा वनवा पेटलाय तो कदाचित पेटलाच नसता. कदाचित संपूर्ण महाराष्ट्र पाणीदार करण्याची ही मोहीम सुद्धा एखाद्या चळवळीसारखी इतकी पसरलीच नसती. कदाचित लोकांनी असं एकत्र येऊन काम केलंच नसतं. कदाचित आम्हाला श्रमदान करण्यासाठी गावागावात जाण्याची आणि नवनवीन लोकांना भेटण्याची संधी मिळालीच नसती. कदाचित या “पानी फौंडेशन”च्या लोकांना तुम्हाला एवढ्या तळमळीने सांगण्याची वेळ आलीच नसती. कदाचित मला या लेखाच्या माध्यमातून सांगायची वेळ आलीच नसती की चला गड्यांनो पेटून उठूया, चला श्रमदान करूया, आपली गावं पाणीदार करूया. मित्रांनो या श्रमदान करणाऱ्या सर्वच लोकांची तळमळ आपण नीट लक्षात घेऊया, भविष्यात निर्माण होऊ शकणारी दुष्काळाची दाहकता लक्षात घेऊया, आपण पुढच्या पिढीला नेमकं काय देणार आहोत हे लक्षात घेऊया, एकदा निघून गेलेली वेळ पुन्हा परत कधीच येत नसते हे ही लक्षात घेऊया. ही जमीन कोणाची, हे गाव कोणाचं, हे शिवार कोणाचं या असल्या संकोचित विचारसरणीत आपण आता गुरफटून जायला नको. मित्रांनो, लोकांनी लोकांसाठी एकत्र येऊन काम करण्याची एवढी मोठी चळवळ खूप दिवसांनी सुरु झाली आहे. नुसती सुरु झाली नाही तर याचा वणवा महाराष्ट्रभर पेटलाय. या वणव्यात समाजमनातल्या षडरीपुंची मात्र राख झालीय. समाजात एक नवचैतन्य नक्कीच निर्माण झालंय. आपण सर्वांनी मिळून या चळवळीला आणखी बळ द्यायलाच हवं. आपण आपला खारीचा वाटा उचलायलाच हवा. आपण फेकून देऊया ते नकारात्मक भुरसट विचार आणि चला पेटून उठूया आणि “चला मित्रांनो श्रमदान करूया”.

पेटलंय सारं रान
चला ठेऊ जाण
राखू माणुसकीचं भान
चला करू श्रमदान
चला करू श्रमदान

- डॉ संदीप सोमेश्वर टोंगळे.

Comments

Popular Posts