जन्म आणि मृत्यू

          आयुष्य म्हणजे एक तोरण आहे. त्यात जन्म आणि मृत्यू हे दोन्ही बाजूचे दोन हुक आहेत. जन्म आणि मृत्यू या दोन टोकांच्या मध्ये संस्कार, शिक्षण, ध्येय, व्यवसाय, पैसा, जिद्द, महत्वकांक्षा, गर्व, दंभ, राग, लोभ, मोह, मत्सर यांची रंगबिरंगी झालर तारेवर लटकवुन आपण आपलं आयुष्य सजवलेलं आहे. शेवटी आयुष्य म्हणजे खरं तर काय असतं......? या झालरीच्या ओझ्याने ताणलेल्या तारेवरची कसरतच ना......! आपण जितकं त्यावर जास्त लटकवत जातो तितकी हुक निसटण्याची भीती वाढत जाते. पण आणखी झालर लटकविण्याची लालसा काही संपत नाही. या ओझ्यामुळे जन्माचं हुक जर निसटलं तर मृत्यू पर्यंत चा प्रवास खडतर जातो आणि मृत्यूचं हुक जर निसटलं तर त्या सजविलेल्या तोरणाच्या झालरीतले एक एक रंग गळून पडू लागतात. ज्या सजलेल्या तारेवर आपण आयुष्यभर कसरत केली ती तार वाकून जाते आणि कालांतराने झिजून नष्ट होऊन जाते. शेवटी काय राहतं शिल्लक......? आपल्या फोटो खाली आपलं नाव आणि नावाखाली जन्म...... आणि मृत्यू...... ची तारीख......!

- डॉ संदीप सोमेश्वर टोंगळे.

Comments

Popular Posts