"भावनांचा बाजार"

भावनांच्या बाजारात मी
सुख-दुःख विकत होतो,
कोमेजून जाऊ नये म्हणून
त्यावर गाणी शिंपडत होतो......

सुख झालंय महाग,
दुःख फार स्वस्त
सुखाला सहानुभूतीचे
गिऱ्हाईक जास्त.....

दुःख काही संपेना,
सुख कमी राहिलं,
दुःखाने माझ्याकडे
रागात पाहिलं......

मला दुःख म्हणालं,
"मला कसं विकायचं
तुला नाही का ठाव?,
बेट्या दुःखालाच सुखाचा
वरून थोडा मुलामा लाव,
आणि वाढव थोडा माझा भाव,
बघ विकत घेईल सारा गाव......"

दुःखाला मी म्हणालो,
"माझ्या कडून शक्य नाही रे
कोणाची तरी फसवणूक,
पण पुन्हा सुख विकत घ्यायला
लोकांना करावीच लागेल
कधीतरी दुःखात सुद्धा गुंतवणूक......

बाजार संपत आला आणि
शेवटी एक कल्पना सुचली
सुख आणि दुःखाची टोपली
एकमेकात मिसळून विकली......

शेवटी सुख म्हणालं,
नाही म्हणता म्हणता
"केलीसच की रे भेसळ"
मी म्हणालो,
"भेसळी शिवाय कशी लागेल
चवदार, आयुष्याची मिसळ......"

सुख दुःखाच्या या भेसळीचा
माणसाला कधी होईल बोध,
दुःखावरच आरूढ होऊन
घ्यावा लागतो सुखाचा शोध......

दुःखापासून आपण पळतोय लांब
सुखाची संपत नाही भूक,
आयुष्याच्या कथेचा
नायकच झालाय मूक......

आता ही भेसळ युक्त
चवदार मिसळ खाताना
नुसतं सुख मजेत खाऊन
दुःख खाली सांडू नका,
आयुष्यातील प्रत्येक रस
चाखून खा, पण
आपल्या मनातल्या
"भावनांचा बाजार"
कधी मांडू नका......

- डॉ संदीप सोमेश्वर टोंगळे.

Comments

Popular Posts